६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं

 

Maharashtra rajyageet

  • Jai Jai Maharashtra Maza will be state song : मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.

Maharashtra State Official Song : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधीच या संदर्भात संकेत दिले होते. काही महिन्यांपूर्वी याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकही झाली होती. राज्यगीत म्हणून निवडीसाठी अनेक गीतं सरकारसमोर होती. मात्र, त्यातून 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत निवडण्यात आलं आहे. हे गीत आजही महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जातं. अनेक सभासमारंभांमध्ये व राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते गायलंही जात होतं. मात्र, त्याला राज्यगीताचा अधिकृत दर्जा नव्हता. तो अखेर मिळाला आहे.

महाराष्ट्र गीताचा इतिहास

'महाराष्ट्र गीत' अशी ओळख असलेलं जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गायलं आहे.

‘या’ राज्यांचं आहे अधिकृत राज्यगीत

देशातील सध्या केवळ १२ राज्यांचं स्वत:चं अधिकृत राज्यगीत आहे. त्यात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या राज्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना

  1. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन-वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
  2. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
  3. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी वंदेमातरम् नंतर लगेचच ध्वनीमुद्रीत राज्यगीत वाजवले/गायले जाईल.
  4. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी, परिपाठ/प्रतिज्ञा/प्रार्थना/राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
  5. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास/गाण्यास मुभा राहील.
  6. राज्यगीत सुरू असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
  7. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
  8. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बॅडमार्फत वाजविता येईल.
  9. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
  10. या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस/कार्यालयांस सूचना द्याव्यात.
  11. माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार/प्रसार करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स, असे करा Download..

पाणी पुरवठा सूचना श्रीरामपूर

शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांमुळे श्रीरामपुरात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या लव जिहादीविरोधात गुन्हा दाखल...